बिग डेटा आणि भविष्यातील संधी !! डॉ. रुपाली कुलकर्णी

 



एकविसावे शतक हे माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रचंड वेगाने होणाऱ्या बदलांचे  साक्षीदार आहे । आज आपण सर्वजण, चुटकीसरशी कामे करण्यासाठी  डिजिटल आणि इंटरनेट सेवा पुरविणाऱ्या उपकरणांचा  आणि अँप्लिकेशन्स वापर करत असतो. आपण या  डिजिटल माध्यमांवर इतके अवलंबून असतो की आपले आयुष्यच आपण डिजिटली जगत असतो, असे म्हटल्यास त्यात कुठलीही अतिशोयोक्ती होणार नाही ! ! पण हे इंटरनेट प्लॅटफॉर्म्स  किंवा उपकरणे आपल्याविषयी नकळत, आपली बरीच माहिती जमा करत असतात.

 

उदाहरण देऊन सांगते. मागे एकदा मला वॉशिंग मशीन विकत घ्यायचे होते.  तेव्हा सवयीप्रमाणे  आवडत्या ई-कॉमर्स एप्लीकेशनवर जाऊन वेगवेगळ्या ब्रँडच्या वॉशिंग मशीन्सची वैशिष्ट्ये आणि त्यांच्या किमतींची तुलना करून पाहिली. दिवसभराचा कामाच्या व्याप संपल्यावर , संध्याकाळी ऑफिस मधून घरी निघताना सहजच फेसबुक उघडले तर वेगवेगळ्या वॉशिंग मशीनच्या सजेशन्सनी वॉल भरून गेली होती.  पार्किंग मधून कार काढली आणि घरी निघाले तर कोपऱ्यावरचा  डिजिटल मॉल  जवळ  येण्याच्या आधीच मोबाईलवर मेसेज झळकला की तुम्ही शोधत असलेले वॉशिंग मशीन या शॉप मध्ये मिळू शकेल.  रात्री उशिराने इंस्टाग्राम उघडले तरी स्वागताला वॉशिंग मशीन पोस्ट्स इथेही हजर ! तर हे सगळे ज्याप्रकारे शक्य होते त्यामागे अदृश्यरित्या  कार्यरत असतो तो बिग डेटा !! आपण सगळेच, हरक्षणी विविध डिजिटल उपकरणे, इंटरनेट माध्यमे, इ-सेवा, अँप्लिकेशन्स, सेन्सर्स  यांच्यामाध्यमातून डिजिटली वेढले गेलेलो असतो !  हे सगळे मध्यस्थ, तुम्ही कुठले माध्यम वापरता, इंटरनेटवर कुठली माहिती शोधता, कुठले व्हिडिओज बघता, सोशल मीडियावर तुम्ही  केव्हा,किती आणि कसे व्यक्त होता, यावर बारीक नजर ठेवून असतात !  आणि जगभरातल्या अशा समस्त जनतेबाबत जेव्हा हे घडते तेव्हा  ही माहिती अर्थात डेटा  प्रचंड आकाराने, वेगाने आणि वेगवेगळ्या स्वरूपात जमा होत रहातो ! हा अवाढव्य माहितीचा साठा  म्हणजेच बिग डेटा ! या बिग डेटा चा वापर करून अनेक उद्योग आणि व्यवसाय भरभराटीस येत आहेत. संभावित ग्राहकांना आपल्या उद्पादनांकडे आकर्षित करणे, आधीपासून ग्राहक असलेल्यांना योग्य वेळेत, सुयोग्य शिफारसी  देऊन त्यांच्याशी  असणारी बांधिलकी जपणे,  ज्या गोष्टींची आवश्यकता ग्राहकांना भासू शकेल अशा उत्पादनांनविषयी त्यांना आगाऊ माहिती पुरविणे  आणि त्या माध्यमातून आपल्या उद्योगाची भरभराट करणे हे बिग डेटाचा  कल्पक आणि सर्जनशील वापर केल्यामुळे  शक्य होते आहे. यातूनच नोकरी आणि उद्योगाच्या अनेक वाटा आणि संधी येणाऱ्या पिढीपुढे उकलत आहेत. संपूर्ण जगभरात या बिग डेटा चळवळीमुळे  रोजगाराच्या संधी, अक्षरशः हजारोंनी तयार होत आहेत. या संधीचा उत्तम फायदा करून घेण्यासाठी येणाऱ्या पिढीने आपली या संबंधित तांत्रिक कौश्यले आत्मसात करण्यावर भर दिला पाहिजे ! या संबंधित, नोकरीत कुठली पदे उपलब्ध होत आहेत त्यावर थोडासा उहापोह.

    डेटा ॲनालिस्ट: यामध्ये बिग  डेटाचे  विश्लेषण करणे, वर्गवारी करणे आणि अशी गाळीव, प्रमाणित असणारी  माहिती व्यवसायासाठी उपयुक्त अशा  स्वरूपात तयार करणे हे मुख्य काम असते.

      डेटा इंजिनियर: यामध्ये बिग डेटाच्या स्वरूपात उपलब्ध असणाऱ्या माहितीचे, व्यवसायाच्या भरभराटीसाठी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विश्लेषण करता येणे आणि त्याद्वारे  ती माहिती संरचित करणे हे काम असते.

     डेटा आर्किटेक्ट: बिग डेटा हा त्याचे प्रचंड आकारमान, उपलब्धतेचा प्रचंड वेग आणि त्याचे वेगवेगळे स्वरूप यातील वैशिष्ट्यांमुळे ओळखला जातो.  तेव्हा या प्रचंड माहिती साठ्याचे जतन करणे,  त्याची सुरक्षा बघणे आणि गरजे प्रमाणे त्याचा पुरवठा करणे हे एक आवाहनात्मक कार्य असते. डेटा आर्किटेक्ट नेमके हे  काम बघतो

     डेटा  कन्सल्टंट: बिग डेटामध्ये दडलेल्या माहितीचे जोपर्यंत सुयोग्यरित्या आकलन होत नाही तोपर्यंत ती माहिती नाही तर केवळ डेटाच असतो !  व्यवसायामध्ये  विविध स्तरांवर  काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना या माहितीचे सुयोग्य आकलन होईल या पद्धतीने तिचे सादरीकरण करणे आणि विविध आलेख, चार्ट, नकाशे या माध्यमातून ती त्यांच्या समोर प्रस्तुत करणे हे डेटा कन्सल्टंटचे काम  असते.

 

या रोजगार संधींशी  जवळीक  करण्यासाठी मशीन लर्निंग, आर प्लॅटफॉर्म , पायथोन तसेच  जावा प्रोग्रामिंग, मॅटलॅब, डेटाबेस ऑपरेशन्स आदी तांत्रिक कौश्यालयांची गरज असते. कोविडच्या या काळात विद्यार्थ्यांपुढे शैक्षणिक आव्हाने जरी असली तरी वेळही उपलब्ध आहे.  आणि म्हणूनच या वेळेच्या उपलब्धतेचे सोने करण्याची  संधीही तितकीच आहे.  Byju's, Udemy, YouTube  सारखे  ऑनलाईन गुरु  उपलब्ध असताना हे करणे सहज शक्य आहे ! तेव्हा बिग डेटाने निर्माण केलेल्या या  संधींचा लाभ घेण्यासाठी या माध्यमांचा  उपयोग नक्कीच करता येईल !! माहिती आणि ज्ञानाचे हे भांडार जितके विशाल आहे  तितकेच रंजकही ! यात जरा डोकावून तर बघुयात ... ऑल दि बेस्ट !!  

डॉ. रुपाली कुलकर्णी,

ऍडजंक्ट प्रोफेसर  , संगणक विभाग  

क.   का. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय,

नासिक,      

     ९०११८९६६८१, rdkulkarni21@kkwagh.edu.in


Reactions

Post a Comment

0 Comments